पश्‍चिम घाटातील मुऱ्या माशांचे प्रजनन चक्क सुळक्यांवर..

 Breeding of mura fishes in the Western Ghats on the caves  
Breeding of mura fishes in the Western Ghats on the caves  
Published on
Updated on

आठ महिने पश्‍चिम घाटातील नद्यांमध्ये वास्तव्य आणि चार महिने प्रजननासाठी किल्ले, सुळक्‍यांवरील पाणवठ्यांत आढळणारे मासे माहीत आहेत तुम्हाला? होय, हे मासे नद्यांमधून किल्ले, सुळक्‍यांवर चढून तिथे पिले जन्माला घालतात . आश्‍चर्य वाटले ना! या माशांना स्थानिक भाषेत मुऱ्या असे म्हणतात. त्यांच्या प्रजननाविषयी प्रथमच संशोधन करण्यात आले असून,  सुमारे सोळाशे मीटर उंचीवर या माशांनी आपला अधिवास शोधला आहे. गुजरातमधील डांग या पश्‍चिम घाटाच्या उत्तरेच्या टोकापासून थेट अंबोलीपर्यंत या माशांचे अस्तित्व आहे. मराठा लोचेस किंवा इंडोरिओनेक्‍टस इव्हरझार्डी असे शास्त्रीय नाव असलेले हे मासे चक्क खडक चढून जातात. अर्थात, हे मासे पाण्याबाहेर कसे राहतात, असा प्रश्‍न पडला असेल. मात्र, धबधबे आणि खडकांवरून कोसळणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाच्या उलट दिशेने त्यांचा प्रवास सुरू होतो. त्यांना असलेल्या विशिष्ट कल्ल्यांमुळे ते खडकांना चिकटून चढतात. त्यांचा हा प्रवास पावसाळा स्थिरावल्यावर म्हणजे धबधबे, प्रवाह सुरू झाल्यावर सुरू होतो.

मराठा लोचेस किंवा मुऱ्या मासे हे पश्‍चिम घाटातील उत्तरेतच सापडतात. हेच या प्रजातीचे वैशिष्ट्य आहे. केरळपर्यंत पसरलेल्या घाटात याच्या अस्तित्वाविषयी माहिती मिळालेली नाही. मुऱ्या माशांमध्ये ३२ उपजाती आढळल्या आहेत. मराठा साम्राज्यातील गडकिल्ल्यांच्या परिसरात हे मासे आढळत असल्याने त्यांना मराठा लोचेस असे संबोधले जाते. - उन्मेष कटवटे (संशोधक, बीएनएचएस)

याच काळात पश्‍चिम घाटात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने नद्या तुडुंब असतात. त्यामुळे नद्यांमध्ये प्रजनन करणे शक्‍य होत नसल्याने हे मासे उंचावर जात असल्याचे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. माशांना चढाईसाठी एक ते पंधरा दिवसांचा अवधी लागतो. पश्‍चिम घाटातील गड, किल्ले, सुळक्‍यांवर पाणवठे आढळतात.  या ठिकाणी हे मासे अंडी घालतात. त्यांना लागणारे खाद्य या काळात मुबलक असते. दऱ्यांमधील तापमानापेक्षा येथील तापमान तुलनेने थंड असते. त्याचप्रमाणे हा प्रदेश मानवाच्या हस्तक्षेपाविना असल्याने त्यांच्यासाठी हा अधिवास सुरक्षित मानला जातो. सुमारे चार महिन्यांचा काळ येथे काढतात. मध्यम आकाराचे मासे झाल्यावर पावसाळा संपण्यापूर्वी पुन्हा खाली नदीत उतरतात. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतील संशोधक उन्मेष कटवटे यांच्यासह अश्‍विनी केसकर, डॉ. राजीव राघवन, मंदार पैंगणकर, प्रदीप कुमकर, श्रीकांत जाधव, आनंद पाध्ये, नीलेश डहाणूकर यांनी २०१३ पासून या माशांवर संशोधन सुरू ठेवले आहे.   -नितीन चौधरी  (सकाळ वृत्तसेवा)  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com